Search This Blog

Saturday, April 18, 2020

# विमा : आजारपणातील आर्थिक आधार #आरोग्य विमा : / आरोग्य विमा : आजारपणातील आर्थिक आधार




गंभीर स्वरूपाच्या व्याधी जडल्या असताना विम्याचे संरक्षण खूपच कामी येते. त्यापैकीच एक ‘क्रिटिकल इलनेस कव्हर’ असलेली पॉलिसी म्हणजे रोगनिदान झाल्यानंतर एकरकमी मोठे साहाय्य विमा कंपनीकडून उपचारासाठी मिळवून देणारा उपाय आहे. यापूर्वी आयुर्विम्याकडे, केवळ मृत्युप्रसंगी संरक्षण म्हणजे आपल्या पश्चात कुटुंबासाठी आर्थिक तजवीज या अर्थाने बहुतांश पाहिले जात होते. परंतु आधुनिक तंत्रज्ञान आणि वैद्यक उपचारातील प्रगतीमुळे बहुतांश दुर्धर आजारांतून आता पूर्ण बरे होता येणे शक्य बनले आहे. अर्थात त्यासाठी खूप मोठा खर्च करावा लागतो. परंतु वैद्यक विमा हा त्यावरील उतारा निश्चितच आहे आणि अगदी सामान्य पगारदार व्यक्तीसाठी महागडा वैद्यक उपचार आवाक्यात आणण्यास तो मदतकारक ठरला आहे.


क्रिटिकल इलनेस कव्हरचे महत्त्व
आपण आपल्या आसपास जरी पाहिले तरी ओळखीपाळखीत कुणी ना कुणी या आजारांचे बळी ठरल्याचे आढळून येईल. कर्करोग, हृदयविकार, महत्त्वाचे अवयव निकामी होणे वगैरे आजार गंभीर जरूर आहेत; पण दुर्धर निश्चितच राहिलेले नाहीत. अर्थात उपचाराचा कालावधी खूप मोठा तसेच वैद्यकीय व बिगर वैद्यकीयदेखील मोठ्या खर्चाचा भार पेलण्याच्या क्षमतेसाठी क्रिटिकल इलनेस कव्हर आवश्यक ठरतो. या पॉलिसीतून निश्चित केलेली हमी रक्कम (सम अॅशुअर्ड) रोगनिदानासरशी ताबडतोब दिली जाते. आधुनिक रुग्णालयांतून आवश्यक ते उपचार त्यामुळे घेता येणे शक्य बनते. परंतु पॉलिसीचे लाभ मिळवण्यासाठी रुग्णालयात दाखल व्हायलाच हवे असेही नाही. या पॉलिसीतून मिळणारा पैसा रुग्णांना उपचाराचा खर्च, डॉक्टरांच्या सल्ल्याने जीवनशैली, आहार, पथ्ये पालनासाठी येणारा खर्च, भारतात अथवा विदेशांत पर्यायी औषधोपचारासाठी, अवयवदाते मिळवण्यासाठी येणारा खर्च आदींसाठी वापरात येऊ शकतो. सामान्य आयुर्विमा अथवा मेडिक्लेम पॉलिसीतील अधिकची भर अर्थात रायडर या स्वरूपात अथवा पूर्णपणे स्वतंत्र क्रिटिकल इलनेस कव्हर पॉलिसी घेता येते. दावे प्रक्रियेत दोन्ही प्रकारच्या पॉलिसीत कोणताही फरक नसतो. दोन्ही प्रकारच्या पॉलिसीत रोगनिदानानंतर मोठी रक्कम विमेदाराला मिळवता येते.

अटींकडे लक्ष द्या
क्रिटिकल इलनेस पॉलिसीसंदर्भात लक्षात घ्यावयाची गोष्ट म्हणजे, रोगनिदानासरशी मोठी रक्कम देताना काही जीवितविषयक शर्ती घातल्या गेल्या आहेत. बहुतांश विमा कंपन्यांनी पॉलिसीधारक दावा दाखल झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत जीवित असावा, अशी अट घातली आहे. या अशा शर्तीपायी, लोक रुग्णालयात भरती होण्याऐवजी उपचाराच्या वेगळ्या पद्धती आजमावून नंतर त्याचा मोबदला विमा कंपनीकडून मिळवण्याचा प्रयत्न करतात. परंतु असा मागाहून मोबदला देणाऱ्या योजनांतही केवळ अॅलोपथी औषधोपचारावर झालेला खर्चच विशिष्ट अटींसह अदा केला जातो. अर्थात हा पर्यायही बहुतेकदा व्यवहार्य ठरणारा म्हणता येणार नाही. त्यामुळे क्रिटिकल इलनेस कव्हर घेताना पॉलिसीच्या अटी-शर्ती काळजीपूर्वक लक्षात घेण्याबरोबरच, विम्याची हमी रक्कम पुरेशी असावी हे पाहणेच अधिक महत्त्वाचे आहे.

आरोग्य विमा - महत्त्वाचे मुद्दे
आजारपण हे सांगून येत नसते, ते कधीही कोणत्याही वेळी आपल्यावर येऊन आदळत असते. म्हणूनच केवळ एखाद-दोन आजारांबाबत दक्षता बाळगण्याऐवजी अनेक गंभीर स्वरूपाच्या आजारांबाबत संरक्षण देणाऱ्या मल्टिपल इलनेस कव्हरला आपण प्राधान्य द्यावे. एकाच पॉलिसीतून संरक्षण मिळवीत असल्याने हप्ताही कमी राहील. क्रिटिकल इलनेस विमा संरक्षण जवळपास सर्वच आयुर्विमा व सामान्य विमा कंपन्यांकडून पुरवले जाते. मागाहून परतावा (रिएम्बर्समेंट) हा प्रकार सामान्य मेडिक्लेम पॉलिसीला लागू होतो. काही विमा कंपन्यांनी महिलांना जडणाऱ्या विशिष्ट गंभीर आजारांसाठी विशेष पॉलिसी आणल्या आहेत. या पॉलिसी चांगल्या असल्या तरी सामान्य व विशेष पॉलिसीतील हप्त्यांचा तुलनात्मक वेध अवश्य घेतला जावा. दोहोंपैकी कशाची निवड करावी हे त्या त्या ग्राहकांनुरूप ठरेल अथवा ठरवले जावे. आयुर्विमा व मेडिक्लेमव्यतिरिक्त गंभीर स्वरूपाच्या आजारांबाबत दक्षता म्हणून स्वतंत्र क्रिटिकल इलनेस पॉलिसीही घेणे नेहमीच चांगले ठरेल. कारण रोगनिदान झाल्याबरोबर, विमेदाराला मोठी रक्कम मिळून निर्धास्तपणे व चांगल्यातील चांगला उपचार घेता येतो. रुग्णालयात भरती न होताही आपल्या मनाजोगते अगदी परदेशात जाऊनही उपचार मिळवण्याचे स्वातंत्र्य अन्य कोणत्याही विमा संरक्षणातून मिळवता येत नाही.

INSURANCE AND BE SECURE 

2 comments:

LIC INDEX PLUS

  LIC Index Plus is a Unit Linked Insurance Plan (ULIP) offered by the Life Insurance Corporation of India (LIC) . ULIPs combine the benef...